जळगाव मिरर | २८ जुलै २०२६
प्रेमविवाह केलेल्या मुलीने आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर श्रीरामपूर शहरात सोमवारी एक हायव्होल्टेज ड्रामा घडला. संतप्त झालेल्या आईने मुलगा व मुलगी बसलेल्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार न थांबवता पुढे नेल्याने कोर्ट परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सुमारे सात ते आठ मिनिटे हा थरार सुरू राहिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शहरात या प्रकाराची मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी यापूर्वी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात संबंधित तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत स्वेच्छेने प्रेमविवाह केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवविवाहित जोडपे सोमवारी श्रीरामपूर येथे आले होते. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना गाठत मुलीला सोबत येण्याचा आग्रह धरला. मात्र तरुणीने आई व नातेवाईकांसोबत जाण्यास स्पष्ट नकार देत पतीसोबतच राहण्याची भूमिका घेतली.
यामुळे संतप्त झालेल्या आईने कारसमोर जाऊन बोनेटवर बसत वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन पुढे चालवत राहिल्याने महिला बोनेटवर बसलेल्या अवस्थेतच कार काही अंतर धावत राहिली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.





















