जळगाव मिरर | २९ जुलै २०२६
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कारवाईचा वेग वाढविला असून, माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर लगेचच शेंदुर्णी येथील संस्थाचालक संजय गरूड यांना अटक करण्यात आली आहे. या सलग कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभाग, संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची व्याप्ती नाशिकपेक्षाही जळगाव जिल्ह्यात अधिक असल्याचे समोर येत आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये एकूण ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल ६३८ शालार्थ आयडी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने या घोटाळ्याचे केंद्र जळगाव ठरत असल्याची चर्चा आहे.
तपास यंत्रणेला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिक्षण विभागाची कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना मागील तारखांच्या (बॅकडेटेड) नियुक्त्या दाखवून शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या प्रक्रियेसाठी बनावट वैयक्तिक मान्यता आदेश आणि शालार्थ मंजुरी आदेशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, शशिकांत हिंगोणेकर यांनी २०११ ते २०१५ या कालावधीत जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना विविध शाळांमधील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतःच्या स्वाक्षरीने वैयक्तिक मान्यता दिली होती. या मान्यतांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करण्यात आले. मात्र, संबंधित वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आदेश बनावट असल्याचे एसआयटीच्या तपासात स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.
हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर अवघ्या दोन दिवसांत शेंदुर्णी येथील संस्थाचालक संजय गरूड यांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील तपास आता अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन अधीक्षक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतरही जिल्ह्यात काही ठिकाणी बॅकडेटेड मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही नियुक्त्यांना न्यायालयीन प्रक्रियेचा आधार दाखवून मंजुरी देण्यात आल्याचेही बोलले जात असून, या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली आहे. या सर्व बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी नाशिकचे विशेष पथक जळगावात दाखल झाल्याची चर्चा दिवसभर शिक्षण विभागात सुरू होती. या पथकाने रडारवर असलेल्या काही व्यक्तींची माहिती गोळा केल्याचे समजते. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही बड्या अधिकाऱ्यांवर, संस्थाचालकांवर आणि संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण घोटाळ्यात सुमारे १२०० हून अधिक व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात असून, २०० हून अधिक शाळांचा समावेश असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि वेतन अधीक्षक हे सर्व तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याने येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





















