रुग्णांना किरकोळ उपचारांसाठी जळगावला पाठवू नका; १०० खाटांच्या रुग्णालयासाठी वाढीव वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणीत काठोके

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णसेवा तसेच रुग्णालयातील विविध समस्यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. २२) आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयात ही आढावा बैठक पार पडली.
बैठकीत रुग्णालयातील एकूण कामकाज, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णांना मिळणारे मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड व ओळखपत्र, विभागनिहाय दिशादर्शक फलक तसेच रुग्णालयातील इतर प्रशासकीय व वैद्यकीय बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली.
वेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारासंदर्भात काही समस्या निदर्शनास आल्या असून, काही ठिकाणी गलथानपणा होत असल्याचे लक्षात आले आहे. त्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या समाधानकारक असली तरी १०० खाटांच्या रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या वाढीव वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी विनंती जिल्हा शल्यचिकित्सकांना केली आहे.
किरकोळ उपचारांसाठी रुग्णांना जळगावला पाठवू नका…..
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार होऊ शकणाऱ्या किरकोळ आजारांच्या रुग्णांना विनाकारण जळगाव येथे पाठविले जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत तातडीने मिळाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रासाठी स्वतंत्र तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयातील सर्व कर्मचारी ड्रेसकोडमध्ये व ओळखपत्रासह कार्यरत असले पाहिजेत. रुग्णांना कोणत्या विभागात जायचे आहे, याची सहज माहिती मिळावी यासाठी आवश्यक दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई : डॉ. सांगळे…..
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांनी सांगितले की, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात छोट्या-मोठ्या अडचणींबाबत माहिती प्राप्त होत होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रत्यक्ष बैठक घेऊन समस्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या कामातील दिरंगाई तसेच रुग्णसेवेत अपेक्षित तत्परता दिसून येत नसल्याची बाब प्रामुख्याने निदर्शनास आली. तसेच उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध असतानाही काही रुग्णांना जळगाव येथे पाठविले जात असल्याचे आढळून आले असून, त्याचे ऑडिट करण्यात आले आहे. रुग्णसेवेत दिरंगाई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला सोडले जाणार नाही. अशा प्रकारची बाब आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. सांगळे यांनी दिला. कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करून पुढील पंधरा दिवसांत रुग्णालयाच्या कामकाजात शिस्तबद्ध नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.
मुक्ताईनगरात हिमोफेलिया सेंटरचा प्रयत्न…..
हिमोफेलिया रुग्णांना फॅक्टर देण्यासाठी सध्या जळगाव येथे जावे लागत असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेत आला. मुक्ताईनगर येथे हिमोफेलिया सेंटर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, स्वतंत्र हिमोफेलिया सेंटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे डॉ. सांगळे यांनी सांगितले.
आढावा बैठकीस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे, आनंदराव देशमुख, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, अफसर खान, नगरसेवक गणेश टोंगे, राजेंद्र वानखेडे, निलेश शिरसाठ, पियुष महाजन यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





















