
भंडाराः वृत्तसंस्था
एका ४५ वर्षीय महिलेला मदतीच्या बहाण्याने दोन जिल्ह्यात सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. हि घटना दिल्लीच्या निर्भया घटनेपेक्षा भयंकर आहे. कान्हाळमोह परिसरात ३५ वर्षीय महिलेवर अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आला आहे. महिलेची प्रकृती बिकट असून नागपुरातील मेडिकलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अत्याचार पीडित महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे पतीने नांदवायला नकार दिल्यानंतर पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. मात्र, तिथेच घात झाला. मदतीच्या बहाण्याने एका कारचालकाने तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.
पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांनी देखील पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.
पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिले. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केले. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.




















