जळगाव मिरर/३० जुलै २०२६
शासकीय वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल ३ हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर ६०० रुपयांची लाच स्वीकारताना बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उमेश शामकांत सपकाळे (वय ४९), कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कार्यालय, बोदवड, जि. जळगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वय ५२ वर्षांचे व्यवसायाने वाद्य कलाकार आहेत. शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी संबंधित योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज केला होता. या अर्जावर कार्यवाहीसाठी पंचायत समिती बोदवड येथे अर्जाची चौकशी होणे आवश्यक होते.
तक्रारदार आपल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात गेले असता, आरोपी कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांनी अर्जावर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडे पाठविण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाशी संपर्क साधून तक्रार दिली.
तडजोडीनंतर ६०० रुपयांची मागणी
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी दि. ३० जुलै २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, बोदवड येथे पंचांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपी सपकाळे यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद जळगाव येथे सादर करण्यासाठी तडजोडीअंती ६०० रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.यानंतर लाच स्वीकारण्याची तयारी आरोपीने दर्शविल्याने एसीबीने सापळा रचला.
कार्यालयाबाहेरील गॅलरीत रंगेहात पकडले
दि. ३० जुलै २०२६ रोजी पंचायत समिती बोदवड कार्यालयातील सामान्य प्रशासन कक्षाच्या बाहेरील गॅलरीमध्ये कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांनी तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशन, जि. जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
ही कारवाई श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., जळगाव यांनी काम पाहिले.सापळा पथकात पाहेकाँ/बाळू मराठे, पोकाॅ/राकेश दुनाने आणि पोकाॅ/अमोल सुवंशी यांचा सहभाग होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे तसेच अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.





















