जळगाव मिरर | ३१ जुलै २०२६
अंडाभूर्जी खावून भरधाव कारने पादचाऱ्यासह दुचाकीस्वाराला धडक दिल्याने लीलाधर मंगल जाधव (वय ३६, रा. कठोरा, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कारने तीन वेळा उलटल्याची घटना घडली होती. कारचालकाने मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. परंतू कार उलटून तो जखमी झाल्यामुळे त्याला नोटीस देवून सोडून दिले आहे. मात्र त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ईच्छादेवी चौकातून जात असलेल्या कन्हैया राजेश गारुंगे (वय ४६, रा. कंजरवाडा) या पादचाऱ्याला उडविल्यानंतर कार दुभाजकावर आदळली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार लीलाधर जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. कारने तीन वेळा पटली घेवून कारचालकासह अन्य तिघे देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
दरम्यान, पोलिसांनी चौघांना बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत कार चालकासह अन्य तिघांनी मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, कार चालक जतीन संजय जाधव (वय २१, रा. वाघनगर) याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले होते. तो चौकशीसाठी पोलीसात हजर झाला मात्र त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु असल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांनी दिली.




















