जळगाव मिरर | ३१ जुलै २०२६
शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीने शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे आर्थीक व्यवहार सांभाळणाऱ्या दीपक गरुड यांना धुळे जिल्ह्यातील बिजासणी घाटातून अटक केली. यावेळी त्यांना आसरा देणाऱ्या तिघांविरुद्ध नाशिक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटकेत असलेल्या संजय गरुड यांना न्यायालयाने दि. ३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या तपासात गरुड यांच्या शिक्षण संस्थेचे आर्थिक व्यवहार दीपक गरुड बघत होते. त्यांच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे प्रस्तावही सादर झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तपासासाठी दीपक गरुड यांचा ताबा घेण्यासाठी पथक त्यांच्या मागावर होते. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढला. दीपक गरुड हे धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील बिजासणी घाटात लपून असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून गरुडसह त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले.
संशयित गरुड यांना आसरा देणाऱ्या सोपान सुपडू बारी (वय ५२, रा. शेंदूर्णी), पंकज माधवराव चव्हाण (वय ४२, रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव) आणि एका युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक रमीज शेख, अंमलदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी, संदीप बागल, कैलास चव्हाण, ठाकरे, देवरे, पानवळ, पालखेडे व पवार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.




















