जळगाव मिरर | ३१ जुलै २०२६
रेल्वेगाड्या व भुसावळ रेल्वे परिसरातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली. उधना-अमृत भारत एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून अंदाजे ३ लाख ९८ हजार ९०० रुपयांचा ७.९७८ किलो गांजा व मुद्देमाल जप्त केला.

गाडी क्रमांक १९०२२ अप उधना-अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये ३० जुलैला सीआयबी, भुसावळचे उपनिरीक्षक सुनील कोळी हे नियमित गस्त घालत होते. त्यावेळी एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यात. चौकशी व तपासणीदरम्यान बाबू विजय गौडा वय २३, रा. धमनखौला, डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा) हा रेल्वेच्या शौचालयात अमली पदार्थ लपवून त्याची वाहतूक करत असल्याचे समोर आले. तर ही गाडी भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पोहोचल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक ओ. पी. मीणा व आरपीएफच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संशयिताला त्याच्या बॅगेसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आली.
दरम्यान, आरपीएफच्या श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ड्युटीवरील ‘वीरू’ या श्वानाने संशयिताच्या बॅगेची तपासणी करताना अमली पदार्थ असल्याचे संकेत दिले. आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनंतर राजपत्रित अधिकारी अभयकुमार शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (गुड्स) यांच्या उपस्थितीत बॅगेची झडती घेण्यात आली. यावेळी बॅगेतून गांजाची चार पाकिटे आढळून आली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन ७.९७८ किलो असून त्याची बाजारातील अंदाजे किंमत ३ लाख ९८ हजार ९०० रुपये आहे. आरोपीसह जप्त केलेला गांजा शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) यांच्या ताब्यात देण्यात आला.





















