जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२६
जिल्हा क्रीडा संकुलात पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या तरुणांसाठी प्रवेश शुल्क १५०वरून घेट ६०० रुपये करण्यात आल्याने तरुणांत असंतोष निर्माण झाला. या शुल्कवाढ विरोधात सोमवारी ३० ते ४० तरुणांनी जीएम फाउंडेशनसमोर ठिय्या मांडून मंत्री गिरीश महाजनांचा रस्ता अडवून घेराव घातला.

पूर्वी केवळ १५० रुपयांत क्रीडा संकुलात पोलिस भरतीच्या सरावासाठी तरुणांना प्रवेश दिला जात होता. मात्र, नुकताच या संकुलात ८ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या नवीन आणि महागड्या सुविधेमुळे संकुलाचे मासिक प्रवेश शुल्क ६०० रुपये करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातून येणाऱ्या, सामान्य घरातील आणि आधीच बेरोजगार असलेल्या तरुणांना ही वाढीव फी परवडणारी नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच १५० रुपये दर आकारण्यात यावे, अशी मागणी तरुणांनी या आंदोलनादरम्यान मंत्र्यांकडे केली.
मंत्री गिरीश महाजन हे खचलेल्या बायपास पुलाची पाहणी करण्यासाठी जळगावात आले होते. सायंकाळी पावणेसहा वाजता ते शिक्तीर्थ मैदानाजवळील जीएम फाउंडेशन येथे आले. माहिती मिळताच पोलिस भरतीचा सराव करणारे सुमारे ३० ते ४० तरुण-तरुणींनी थेट फाउंडेशन गाठले आणि गेटसमोरील रस्त्यावर ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली. मंत्री महाजन जोपर्यंत आमची मागणी ऐकून घेणार नाहीत, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.
रस्त्यावर कोंडी झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक तरुणांना आत बोलावून त्यांची कानउघाडणी केली. चर्चेतून प्रश्न सुटू शकत असताना रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरू नका. गुन्हे दाखल झाल्यास करिअर खराब होईल, असा सल्ला देत मंत्री महाजनांनी तरुणांच्या मागण्या ऐकून घेतल्या.




















