जळगाव मिरर | 7 ऑगस्ट 2026
राज्यभरात बहुचर्चित कथित ऑडीओ क्लिपमध्ये जातीवाचक शिवीगाळसह शिवराळ भाषेचा वापर केल्याप्रकरणी भाजपाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने (एलसीबी) धुळे येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे

गेल्या महिन्याभरात भाजपाचे तत्कालीन प्रदेश महामंत्री तसेच तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय वसंत चौधरी यांच्या मोबाईलमधील संभाषणाच्या कथीत बहुचर्चित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. एका ऑडिओ क्लिपमध्ये भाजपाच्या माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या बद्दल जातीवाचक शिवीगाळ तसेच शिवराळ भाषेचा वापर आणि अनुचित संभाषण करण्यात आल्याने त्यांच्याविरुध्द रोहन शरद गावित यांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यांतर्गत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच शहरातील एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेनेही दोन दिवसांपुर्वी एका ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चौधरी हे जिल्हयाबाहेर होते.
दरम्यान, काल दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास विजय चौधरी यांना नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळे चाळीसगाव रस्त्यावरुन ताब्यात घेतले. ते चाळीसगाव येथून धुळ्याकडे त्यांच्या वाहनाने येत असतांना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नंदुरबार येथे आणल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेणार आहे. त्यानंतर त्यांना रितसर अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. त्यांना आज (दि.७) न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे संपुर्ण उत्तर महाराष्ट्रात खळबळ उडाली असून त्यांना अटक केल्यानंतर ऑडिओ क्लिपबाबत करण्यात येणाऱ्या पोलीस तपासाबाबत आणखी कोणकोणते मुद्दे बाहेर पडतात याकडे आता संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.




















