जळगाव मिरर | 7 ऑगस्ट 2026
आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूवर जिल्हा पोलीस दलाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात यापूर्वीच हद्दपार करण्यात आलेले आणि जनमानसात दहशत निर्माण करणाऱ्या – ७ टोळ्यांतील १५ व इतर ३५ अशा एकूण ५० सराईत गुन्हेगार सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात परत येऊ नयेत, म्हणून पोलिसांकडून त्यांच्यावर विशेष वॉच ठेवण्यात येणार असून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून ५० हद्दपार असलेल्या गुन्हेगारांची नावे जाहीर करून, त्या-त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. तसेच हद्दपारीच्या काळात जर हे हद्दपार आरोपी हद्दपारीच्या काळात दिसले तर त्यांच्याबाबतची माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले.
आहे. जिल्ह्यात यापूर्वी एकूण ७ टोळ्यांमधील १५ गुन्हेगार आणि ३५ वैयक्तिक गुन्हेगार अशा एकूण ५० सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या हालचालींवर कसून नजर ठेवली जात आहे. एमआयडीसी, एरंडोल, नशिराबाद, रामानंदनगर, जळगाव शहर, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, चोपडा आणि धरणगाव परिसरातील जे गुन्हेगार यापूर्वीच हद्दपार करण्यात आले आहेत, त्यांच्यावर पोलीस ठाण्यांमार्फत सतत वचक ठेवला जात आहे. या सर्व ५० गुन्हेगारांना त्यांच्यावर निश्चित केलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास, वास्तव्य करण्यास किंवा फिरण्यास मज्जाव आहे.
हद्दपार असतानाही कुणी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे निदर्शनास आल्यास, तो भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत अत्यंत गंभीर व दखलपात्र अपराध ठरवून तात्काळ अटकेची व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील – आकाश उर्फ खंड्या ठाकूर, -पवन उर्फ बद्या बाविस्कर, आकाश उर्फ आक्या ब्रो मराठे, आकाश दहेकर, टारझन उर्फ बल्लू दहेकर, अमन उर्फ खेकडा रशिद सैय्यद, रवी चव्हाण, गुरुदयालसिंग टाक, गिरीष घुगे (वंजारी) तर शनिपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील – भूषण अहिरे, तेजस सोनवणे, राकेश सपकाळे, फिरोज शहा, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील – अक्षय उर्फ बाब्या धोबी व सागर उर्फ भोला भोई यांचा समावेश आहे.





















