जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२६
दुसऱ्या मजल्यावर बांधकामाच्या ठिकाणी ‘वेस्ट मटेरिअल’ फेकताना विज तारांचा स्पर्श होऊन अमीन शेख नवाब (वय २२, मूळ रा. भडगाव, ह.मु. सुप्रीम कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी विदगाव येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करणारा अमीन शेख हा तरुण दि. १८ रोजी विदगाव येथे एका घराच्या बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर काम करत होता. तेथील वेस्ट मटेरिअल तो खाली फेकत असताना घराजवळून गेलेल्या विज तारांना स्पर्श झाला आणि तो तेथेच कोसळला. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका जणाच्या लक्षात आला व त्याने इतरांना माहिती दिली. त्या वेळी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमीन शेख याचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तसेच भडगाव येथून ते कामासाठी जळगावात आले असून ते सद्या पत्नीसह सुप्रीम कॉलनीमध्ये वासतव्यास होते. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मोठा भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.
–




















