जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२६
गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती व या अवैध वाळूची वाहतूक होत असताना पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तस्करीसाठी साठवून ठेवलेला ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा तालुका पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी कानळदा ते ममुराबाद दरम्यान कच्च्या रस्त्यावर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा ते ममुराबाद दरम्यान तस्करीसाठी वाळू साठवून ठेवल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह उपनिरीक्षक विजय पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी तेथे तब्बल ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा आढळून आला. याविषयी तलाठ्याला माहिती देत कारवाई सुरू केली व वाहनांद्वारे ही वाळू जप्त करण्यात आली.
नदीपात्रातून वाळूचा उपसा करून हा साठा इतरत्र विक्रीसाठी साठवून ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा साठा कोणी साठवून ठेवला, याचा शोध पोलिस व महसूल पथक घेत आहे. दरम्यान अशा प्रकारची कारवाई नियमतीतपणे व्हावी, अशी मागणी होत आहे. ममुराबाद गावाबाहेरील तलावाजवळ सकाळी १२ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रॅक्टर तहसीलदार शीतल राजपूत यांच्या निदर्शनास आला. ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर घेऊन पळ काढला.
तहसीलदारांनी सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून २ अखेर ट्रॅक्टर पकडण्यात यश मिळविले. मात्र, ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला. यावेळी ममुराबाद येथील काही तरुणांनी ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदारांना मोलाचे सहकार्य केले. महसूल विभागाकडून ट्रॅक्टरवर पुढील कारवाई करण्यात येत आहे.
पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग !
जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनामार्फत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात होत असून ही कारवाई महसूल प्रशासनाने करणे महत्वाचे असले तरी जळगाव जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून झोपेचे सोंग घेतले आहे. यात अनेक आर्थिक व्यवहाराचे गंभीर आरोप महसूल प्रशासनातील महत्वाच्या अधिकाऱ्यांवर देखील नेहमीच केले जात असतात.





















