जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२६
खूनाच्या गुन्ह्यात कारागृहातील बंदीचा वाढदिवसानिमित्त कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर फटाके फोडून जल्लोष करणारे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव या दोघांना अटक करण्यात आली. त्या दोघांची शनिपेठ पोलीस ठाण्यासह कारागृह परिसरातून पायी धींड काढून त्यांची दहशत मोडून काढली.

मिळालेल्या माहितीनुसार, खूनाच्या गुन्ह्यात सन २०२१ पासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला आकाश मुरलीधर सपकाळे या बंदीचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवसानिमित्त दि. २० ऑगस्ट रोजी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव, विकास उर्फ गुड्डूया संतोष भालेराव, विशाल गोसावी व गौरव उर्फ बंटी गौतम सपकाळे हे रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ टवाळखोरांनी फ टाके फोडून जल्लोष केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर फटाके फोडल्यामुळे त्यातून उडणाऱ्या ठिणग्या संरक्षक भिंतीच्या आत येवून कॅन्टीनमधील मालमत्तेचे नुकसान होवून कारागृहातील कैद्यांच्या जिवितास हाणी पोहचली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया याच्यासह शुभम जाधव या दोघांना ताब्यात घेतले. कारागृहाच्या आवारात स्फोटक पदार्थ फोडून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरीत तिघांचा कसून शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या विक्की शिंदे उर्फ छोटा माया याच्याविरुद्ध खून, जबरी चोरी, हाणामारी या सारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसून कायद्याचा धाक रहावा, या करीता जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उल्हास चहाटे, गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ गणेश शिरसाळे, किरण वानखेडे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवेकर, तुषार पाटील यांच्या पथकाने शनिपेठ व कारागृहाच्या मागील परिसरातून धिंड काढली. अटकेत असलेल्या विक्की शिंदे व शुभम जाधव या दोघांना अटक केल्यानंतर गुरुवार दि. २७ रोज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने य दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठीत ठेवण्याचे आदेश दिले.




















