जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२६
देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनानिमित्त मेहरूण परिसरातील महिला भगिनींतर्फे राख्या पाठविण्यात आल्या आहेत. ‘विचार वारसा फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हा सामाजिक व कौटुंबिक उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला. गोळा झालेल्या सर्व राख्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे जवानांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या.

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मेहरूण परिसरातील सप्तशृंगी नगर, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, महाजन नगर, नागसेन नगर, एमडीएस कॉलनी, साई प्रसाद कॉलनी आदी भागातील महिला भाविकांनी एकत्र येत या राख्या जमा केल्या. सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांचे रक्षण व्हावे आणि त्यांना सणाचा आनंद मिळावा, या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी सातत्याने घेतला जातो.
राख्या सुपूर्द करताना विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्यासह कैलास प्रजापत, संकेत म्हस्कर, गौरव डांगे, अजय मांडोळे, आशिष राजपूत, मनीष चौधरी, गितेश पवार, ऋषिकेश राजपूत, निखिल शेलार, अभिजित राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




















