जळगाव मिरर | 3 सप्टेंबर 2026
नशिराबाद परिसरातील एका मोठ्या प्रतिष्ठानच्या सुपरवायझरने एका चिकूच्या मळ्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. सुनील सावके (वय ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो नशिराबाद परिसरातील एका मोठ्या प्रतिष्ठानमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुनील सावके याने १३ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून एका चिकूच्या मळ्यात नेले. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलीच्या आईने तत्काळ नशिराबाद पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नशिराबाद पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि संशयित सुनील सावके याला शोधून पॉक्सो कायद्यान्वये अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात नशिराबाद पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. योगिता नारखेडे यांच्या पथकातील पो.उ.नि. विजय कोळी, पोलीस कर्मचारी गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर भिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार, भूषण पाटील आदींनी केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.





















