जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२६
हरिविठ्ठल नगर परिसरातील ज्ञानेश्वर दत्तू मिस्तरी या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मोठ्या भावाच्या निधनानंतर आलेल्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईक व पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मिस्तरी याच्या मोठ्या भावाचा सुमारे चार महिन्यांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला होता. भावाच्या अचानक जाण्याने ज्ञानेश्वर मानसिक धक्क्यात होता आणि तेव्हापासून तो सतत तणावाखाली वावरत असल्याची माहिती नातेवाईक व पोलिसांनी दिली. बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर झोपेतून उठला असता, आईने त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने बाथरूमला जात असल्याचे सांगितले. मात्र, तिथून थेट घराजवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर जात त्याने समोरून येणाऱ्या रेल्वेखाली उडी घेतली. सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथे ओळख पटल्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर आता लहान मुलाचाही मृत्यू झाल्याने मयत ज्ञानेश्वरच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी योगेश माळी करत आहेत.





















