जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२६
चाळीसगाव तालुक्यातील करगाव गावाजवळ आश्रम शाळेच्या मागे गांव पांढरी शिवारातील तलावात गणपती विसर्जन करतेवेळी पाण्यात बुडून करगाव तांडा नंबर २ मधील ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करगाव तांडा २ मधील ३० वर्षीय तरुण अनिल बुधा कुऱ्हाडे हा तरुण दि.२६ रोजी गांव पांढरी शिवारातील तलावात गणपती विसर्जनासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि विजय माळी, एएसआय युवराज माळी, हवालदार प्रवीण सपकाळे, संदीप पाटील, पो.कॉ. बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने अनिल कुऱ्हाडेचा मृतदेह काढण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.




















