जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२६
जळगाव जिल्ह्याची सकारात्मक ओळख अधिक दृढ करण्यासाठी सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कंटेंट क्रिएटर्सची विशेष बैठक ३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीस अजय कुमावत, माही सुर्वे, आरजे समृद्धी, काळू रायडर यांच्यासह जिल्ह्यातील विविध कंटेंट क्रिएटर्स उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, संस्कृती, कला, शिक्षण, उद्योजकता, कृषी, सामाजिक उपक्रम तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध नागरिकाभिमुख योजनांची माहिती सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कंटेंट क्रिएटर्सनी आपल्या डिजिटल उपक्रमांसह विविध कल्पना व अनुभव जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, सकारात्मक माहितीचा प्रसार तसेच समाजहिताच्या उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देण्याबाबतही विचारविनिमय झाला. ‘माझे जळगाव – सकारात्मक जळगाव’ ही भावना अधिक दृढ करण्यासाठी जिल्ह्यातील सकारात्मक घडामोडी, स्थानिक यशोगाथा आणि नागरिकहिताचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचविण्यात कंटेंट क्रिएटर्सची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
यावेळी बोलताना अजय कुमावत यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेंट क्रिएटर्सच्या कल्पनांवर दाखविलेला विश्वास प्रत्यक्ष कामातून सिद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाच्या विविध योजना आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली महत्त्वाची माहिती सोशल मीडिया चॅनेल्सच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.




















