जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२६
घरी कोणीही नसतांना लक्ष्मण भानुदास पाटील (वय ३७, रा. धनगर वाडा, जुने जळगाव) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर उघडकीस आली. वडीलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बघताच त्याने आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जूने जळगावातील धनगर वाडा परिसरात राहणारे लक्ष्मण पाटील हे शहरातील एका स्पेअर पार्टच्या दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी सकाळी लक्ष्मणची पत्नी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली होती. तर त्यांचा १० वर्षांचा मुलगा गौरव हा देखील शाळेत गेला होता. त्यामुळे घरात लक्ष्मण एकटाच होता. घरात कोणीही नसल्याचे पाहून लक्ष्मणने गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले.
सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मुलगा गौरव हा शाळेतून घरी परतला. त्याने घराचा दरवाजा उघडताच त्याला समोर त्याचे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हा भयंकर प्रसंग पाहून घाबरलेला गौरव रडतच घराबाहेर पळत आला. त्याला असे रडताना पाहून शेजाऱ्यांनी त्याला काय झाले म्हणून विचारपूस केली. मात्र, घाबरलेल्या चिमुकल्याने केवळ घराकडे बोट दाखवले. गौरवच्या इशाऱ्यानुसार शेजाऱ्यांनी लागलीच घरात जाऊन पाहिले असता, त्यांना लक्ष्मणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी त्वरित शनिपेठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून लक्ष्मणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. लक्ष्मणने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, है अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.




















