जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२६
चाळीसगाव तालुक्यातील भोरस खुर्द येथील नवदुर्गा मित्र मंडळाचे सदस्य सप्तशृंगी गडावरून देवीची पायी ज्योत घेऊन परतत असताना झालेल्या भीषण अपघातात आनंद परमेश्वर पाटील (वय ३९) या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. १० ऑक्टोबरला दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील सौंदाणे फाट्याजवळ हा अपघात घडला.

या अपघातात काळ्या रंगाच्या वाहनाने जबर धडक दिल्याने आनंद पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भोरस खुर्द येथील नवदुर्गा मित्र मंडळाचे १५ ते २० सदस्य ९ ऑक्टोबरला सप्तशृंगी गडावर देवीची ज्योत आणण्यासाठी गेले होते. देवीची ज्योत घेऊन पायी परत येत असताना मुंबई महामार्गावरील सौंदाणे फाट्याजवळ काळ्या रंगाच्या वाहनाने जबर धडक दिल्याने आनंद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
आनंद पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधार असलेला कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. मयत आनंद पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोरस खुर्दसह संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.





















