जळगाव मिरर | १६ ऑक्टोंबर २०२६
तालुक्यातील शेतशिवारातून विजेच्या तारा चोरी करणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या विजतारांचे तुकडे वितळवून तयार केलेले सुमारे २६ किलो भंगार जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील विजतार चोरीच्या घटनांच्या तपासाला गती मिळाली आहे. राजेंद्र ठाकूर यांच्या शेतशिवारातून वीज खांबावरील अंदाजे ५० हजारांच्या अॅल्युमिनियम वीज तार चोरीला गेली होती. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा ६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पो.नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू होता. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करूनही सुरुवातीला ठोस माहिती मिळत नव्हती. तर, रावेर शहरातील भंगार दुकान, भुरटे चोर व संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. १४ ऑक्टोबरला गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे) या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी विजेच्या तारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चोरीच्या तारांपासून तयार केलेले सुमारे २६ किलो भंगार जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अजून कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पो.नि. संदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली.



















