जळगाव मिरर | १६ ऑक्टोंबर २०२६
भुसावळ येथील सराफ बाजारातील नामांकित ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अकोला येथून अटक केली आहे. मुमताज परविन अब्दुल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास भुसावळ येथील सराफ बाजारातील ‘बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स’ या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरून नेले होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिला अकोला येथे असल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने अकोला येथे जाऊन अकोट फाईल पोलिसांच्या मदतीने मुमताज परविन अब्दुल (रा. नेहरू नगर, सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला) हिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तिने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या दागिन्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सोन्याचे मंगळसूत्र : वजन १४.५८० ग्रॅम, किंमत २ लाख ४० हजार रुपये सोन्याचे पेंडल : वजन ३.३१० ग्रॅम, किंमत ६० हजार रुपये. दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत तीन लाख रुपये असून, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, अश्विनी सावकारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रिझवान शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.




















