जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२६
भुसावळ तालुक्यातील फेकरी परिसरातील एका महिलेच्या घरात शिरुन त्यांचा विनयभंग, सुरीने हल्ला करुन सोन्याची चैन हिसकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, महिलेच्या मदतीला धावलेल्या शेजाऱ्यावरही सुरीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी देवेंद्र अशोक सरवटकर याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या आठ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला या फेकरी परिसरात आपल्या सासू आणि दोन मुलांसह राहतात. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, २१ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता संशयित आरोपी दारूच्या नशेत महिलेच्या घराच्या गेटजवळ आला आणि अश्लील शिवीगाळ करू लागला. तर, सायंकाळी ७.३० वाजता संशयित धारदार सुरी घेऊन घरात शिरला व त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध केला, तर तिच्या सासूला ढकलून दिल्याचाही आरोप आहे.
महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने सुरी फिरवली. यात महिलेच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि दंडाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. त्यांनी महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने त्यांच्यावरही सुरीने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात त्यांच्या गालालाही इजा झाली आहे. या घटनेदरम्यान महिलेच्या गळ्यातील अंदाजे दोन ग्रॅमची सोन्याची चैन बळजबरीने संशयिताने हिसकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भात आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तास भुसावळ तालुका पोलीस करत आहेत.




















