जळगाव मिरर | संदीप महाले
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. विविध ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून कारवाया होत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र दिवाळीसारखा मोठा सण जवळ आला असतानाही अशा प्रकारची ठोस कारवाई सार्वजनिकरीत्या दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दिवाळीचा सण म्हटला की मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. जळगाव शहरातही सध्या मिठाई आणि फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. अनेक मिठाईची दुकाने, रेस्टॉरंट्स तसेच विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची निर्मिती आणि विक्री केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे की नाही, याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे.
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त किंवा अस्वच्छ वातावरणात तयार केलेले खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मिठाईची दुकाने, फराळ उत्पादक आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात प्रशासनाची सक्रियता नेमकी कुठे दिसतेय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत जळगाव शहरातील सहा आयुक्त यांना संपर्क केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेल्या नाही.
जळगाव शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे यापूर्वी तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने आता त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे धाव घेतली आहे. शहरातील मिठाईची दुकाने, फराळ तयार करणारी ठिकाणे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांबाबत तक्रारी करण्यात आल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. राज्याच्या इतर भागांत प्रशासनाकडून कारवाई होत असताना जळगावमध्येही तशाच प्रकारची तपासणी आणि कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांच्या थेट हस्तक्षेपानंतर जळगावमधील मिठाई दुकाने, रेस्टॉरंट्स आणि फराळ उत्पादकांच्या तपासणीला वेग येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळीच्या गोडव्यात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी जळगावच्या अन्न व औषध प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज आहे!




















