जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुल व मुली गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविण्याच्या अनेक दुर्देवी घटना घडत असताना आज पुन्हा एकदा जळगाव शहरातील एका ११ वीचे शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आई वडील घरी नसताना गळफास घेतल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या जळगावातील विठ्ठलपेठ परिसरातील रहिवासी ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (वय-१७) हि आई,वडील व लहान भाऊ यांच्यासोबत परिसरात वास्तव्याला होती. तिने नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील का.ऊ. कोल्हे विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावात असल्याचे समोर येत आहे. शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते.
त्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्यावेळाने लहान भाऊ दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने आक्रोश करून नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.