जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४
शहरातील नवीन बसस्थानकडून न्यायालयाकडे सुसाट निघालेल्या दुचाकीस्वाराने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका पादचा-यास उडविल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. शामराव बबनराव पाटील (वय ६८, रा. महाबळ कॉलनी) असे जखमी पादचा-याचे नाव असून त्यांच्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलिसात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ येथील शामराव पाटील हे सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळून पायी जात होते. तेव्हा नवीन बसस्थानकाकडून कोर्टाकडे सुसाट निघालेल्या दुचाकीस्वाराने (एमएच. १९. इएफ.७१२७) शामराव यांना मागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला. मंगळवारी पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.