
जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
घरात भरुन ठेवलेल्या कापसाला योग्य वेळी योग्य भाव मिळत नसल्याने पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील एका ५६ वर्षीय शेतकऱ्याने आज सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन मदन तवर (वय ५६) हे पत्नी, ३ मुले, सुना, नातवंड यांच्यासोबत राहत होते. कोरडवाहू अल्पशा शेतजमीनीवर व मजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात जेमतेम कापूस पिकाचे उत्पन्न हाती आले. यातच मे, जून महिन्यापासून शेती मशागत, बि, बियाणे खते, किटकनाशके व अंगमेहनत केल्यामुळे घरातील परिस्थिती नाजूक होती. यातच अधुनमधून वैद्यकीय व दैनंदिन खर्च करत संसाराचा गाडा ओढतान सुरु होती.
शेतात पिकवलेला कापूस घरात आला. पण चांगला भाव मिळत नसल्याने कापूस पिकासाठी झालेला खर्च व कापूस विकून हातात येणारा पैसा, इतर देणेघेणे याचा बजेट बसवत गजानन तवर आकडेमोड करत भविष्याची स्वप्ने रंगवत होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने गजानन तवर चिंतेत होते. घरातील परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी तिन्ही मुले व सुनांना ऊस तोडणीसाठी कारखान्यावर पाठवले. दरम्यान, जून महिन्यापर्यंत लागणारा कौटुंबिक खर्च, पुढील वर्षी जून महिन्यात शेती, मशागत, बि, बियाणे याकरिता पैसा कुठून आणायचा, याच विवंचनेतून १९ डिसेंबरला सायंकाळी घरात कुणीही नसतांना गजानन तवर यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारात मते मिळवण्यासाठी उमेदवारांनी शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करु, सातबारा कोरा करु, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता अधिवेशन होवूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेतले नाही. यातच कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून याच निराशेतून कुऱ्हाड तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन तवर यांनी आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून आतातरी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे