
जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळावी यासाठी अपक्ष उमेदवाराने स्वतःच्याच घरावर दोन्ही मुलांसोबत संगणमत करुन शालकाला गोळीबार करण्यासाठी सुपारी दिली होती. त्यानुसार मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा याने साथीदाराच्या मदतीने गोळीबार केला होता. दरम्यान फरार असलेल्या मोहम्मद शफि क उर्फ बाबा (रा. मालेगाव) याच्यासह उमेदवाराचा मुलगा शेख उमर फारूक अहमद हुसेन (रा. जळगाव) यांच्या एलसीबीच्या पथकाने मालेगाव येथून मुसक्या आवळल्या. त्या दोघांना दि. १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रचार काळात सहानभूती मिळावी, यासाठी त्यांनी दोन्ही मुले, शालक आणि त्याचा मित्र यांच्या मदतीने दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता गोळीबार करून घेतला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ५ डिसेंबर रोजी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेनसह त्याचा मुलगा शिबान फाईज अहमद हुसेन दोन्ही रा, जळगाव आणि नातेवाईक इरफान अहमद मोहम्मद हुसेन रा. मालेगाव या तिघांना अटक केली होती. यातील मोहम्मद शफिक शेख अहमद आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन हे फरार होते. दरम्यान ते दोघ मालेगावला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संशयितांच्या अटकेसाठी पथक रवाना केले होते.
पथकाने अटक केलेल्या संशयितांकडून गोळीबार केलेले गावठी पिस्तुल व दुचाकी हस्तगत केले. त्यांची चौकशी केल्यानंतर उमेदवाराने ४७ हजारात सुपारी दिली होती. परंतु त्याने केवळ ३५ हजार रुपये दिले होते. तसेच गोळीबार केल्यानंतर संशयित हे जळगाव, अजिंठा, सिल्लोड, चाळीसगावमार्गे मालेगावात पोहचल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दोघांना दि. १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.