
जळगाव मिरर | ९ जून २०२६

खिचडी खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना शहरातील शामनगर परिसरात उघडकीस आली आहे. रस्त्यावर पडलेला दगड डोक्यात घालून जीवन शालीक पाथरकर (वय ३८, मूळ रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, अजित पाटील आणि सुधाकर अंभोरे यांनी रुग्णालयात धाव घेत तपास सुरू केला. प्रारंभी मृत व्यक्तीची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर मृताची ओळख जीवन शालीक पाथरकर अशी पटली. मृतदेहावरील गंभीर जखमा पाहून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जीवन पाथरकर हे दोन संशयितांसोबत बसले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः आणलेली खिचडी एका वृद्ध व्यक्तीला खाण्यासाठी दिली. तसेच ती खिचडी तिसऱ्या व्यक्तीला देऊ नये, असे सांगितल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयिताने जीवन पाथरकर यांना बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान पाथरकर खाली पडले असता, संशयिताने रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.
जीवन पाथरकर हे मूळचे जामनेर तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात ते वृद्ध आईसोबत जळगावात वास्तव्यास आले होते. पत्नीने साथ सोडल्यानंतर आणि मुलाने स्वतंत्र संसार थाटल्यानंतर ते एकटेच राहत होते. मिळेल ते काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या पाथरकर यांचा शेवट अशा दुर्दैवी घटनेत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मामाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचा भाचा तुषार राजेंद्र सुतार हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याने मृतदेहाची ओळख पटविताना गेल्या दोन दिवसांपासून मामासोबत वाद घालणाऱ्या दोघांवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी संशयितांचा शोध घेत एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास रामानंद नगर पोलीस करीत असून चौकशीनंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















