जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील अनेक शहरात मारहाणीच्या घटना घडत असतांना नुकतेच बोदवड तालुक्यातील एका गावात मारलेला साप घरासमोर का फेकला याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन शेजारच्यांनी दाम्पत्याला घरात घुसुन मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विलास सीताराम पाटील (वय ४०, रा. मनूर, ता. बोदवड) या तहसील कार्यालयातील शिपायाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मनहेलावणारा आक्रोश केला. बोदवड तहसील कार्यालयात शिपाई असलेले विलास पाटील हे मनूर येथे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांच्या घरात साप निघाला असल्याने त्यांनी सापाला मारले. त्यानंतर मेलेला साप हा विलास पाटील यांच्या घरासमोर फेकून दिला होता.
दरम्यान,विलास पाटील यांच्या पत्नीने मेलेला साप इथे का फेकला त्याला दुसरीकडे फेकून द्या, माझे मुल आजारी असून ते घाबरुन जातील असे सांगितले. त्याचा राग आल्याने शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचे भांडण सुरु असल्याने विलास पाटील हे भांडण सोडविण्यासाठी आले. दरम्यान, नाना पाटील, महेंद्र पाटील, विजय पाटील, पवन पाटील, अक्षय पाटील यांनी विलास पाटील यांना घरात घुसून त्यांना लाथाबुक्क्यांसह लाठीने बेदम मारहाण केली होती.
विलास पाटील यांच्या छातीला आणि डोक्याला बेदम मारहाण झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, त्यांच्या पत्नीने त्यांना गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रुग्णालयता हलविले. मात्र तेथील डॉक्टरांनी देखील त्यांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला.
विलास पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रात्रीच्या सुमारास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र विलास पाटील यांना झालेल्या मारहाणीत त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असतांना नशिराबाद पोलिसांनी विलास पाटील यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.