जळगाव मिरर | १६ मे २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून निरभ्र आकाश व स्वच्छ वातावरणामुळे बहुतेक भागांत उन्हाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारी खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तसेच मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यानंतर तापमान २ ते ३ अंशाने घटण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील उर्वरित काही जिल्ह्यांत ५ दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंशांनी घटण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. मुंबई व कोकणात कमाल तापमान व आर्द्रतायुक्त गरम हवेमुळे उकाडा जाणवत असून ही स्थिती मंगळवारपर्यंत राहू शकते. मोचा चक्रीवादळ बांगलादेश व ब्रह्मदेश सीमेवरील ‘कोक्सबझार’ व सीट्टवेजवळील कॅऊकपायऊ शहरांदरम्यानच्या किनारपट्टीवर आदळले आहे. तेथे ताशी १६० ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ब्रह्मदेशाच्या भूभागावर घुसून ते विरळ होत आहेत. त्यामुळे पूर्व व पूर्वोत्तर राज्यांत अतिजोरदार वादळी वारा व जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान
नंदुरबार ४३.४ , जळगाव ४२,अमरावती ४३, अकोला ४२.८, अकोला ४२.८, नांदेड ४२.६