बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील एका शेतकऱ्याला बैलाने शिंग मारल्याने मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. यामध्ये शेतकरी भगवान भिका माळकर (वय ६५) यांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मनूर येथील शेतकरी भगवान माळकर हे शुक्रवारी ५ रोजी सकाळी दहाच्या सुमारास शेतात बैलगाडी घेऊन गेले असता बैलाने त्यांना शिंग मारले. गुप्तांगावर मार लागल्याने त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासनी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी प्रकाश रमेश बिजागरे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप झरवाल करीत आहेत. भगवान माळकर यांच्या अचानक मृत्युमुळे मनूर गावात शोककळा पसरला असून, त्यांना दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर मनूर बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.