जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४
शेतातील कामे आटोपून घराकडे बैल गाडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलगाडीला मागाहून बसने धडक दिली. या अपघातात जांभोरे येथील शेतकऱ्यासह बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील जांभोरे येथील शेतकरी गोपाल केशव अहिरे (वय ६७) हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. पारोळा ते धरणगाव रस्त्यावरुन जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक ते धरणगाव बस (एमएच- २०, बीएल- ३३६३) ने शेतकरी गोपाल अहिरे यांच्या बैलगाडीला मागाहून जबर धडक दिली. यात बैलगाडीचा चुराळा होऊन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर बैलगाडीवरील शेतकरी गोपाल अहिरे हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर अहिरे यांना त्यांचे लहान भाऊ नाना अहिरे यांनी तत्काळ धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय त्यांना रुग्णवाहिकेने हलवण्यात आले.
परंतु, गोपाल अहिरे यांच्या डोक्याला आणि कमरेला तसेच पायांना जबर मार लागल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकासह वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोपाल अहिरे हे शेती व्यवसाय करायचे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून तसेच घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबाला संबंधित विभागाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी या वेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. दरम्यान, मृत शेतकरी गोपाल अहिरे यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी गोपाल अहिरे यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.