जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
मंदिरात दर्शन घेवून घराकडे पतरणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी १ लाख ५७ हजार रुपये किंमतीची पाच तोळे सोन्याची मंगलपोत जबरीने चोरुन नेली. ही घटना दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अयोध्या नगरातील महेश प्रोव्हीजन्स समोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अयोध्या नगरात लक्ष्मी लक्ष्मीकांत सोनवणे (वय ५५) या वास्तव्यास असून दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास त्या परिसरात आलेल्या महादेव मंदिरात गेल्या होत्या. मंदिरात दर्शन घेवून घरी परतत असतांना त्यांच्या समोरील रोडवरुन दोन दुचाकीस्वार तरुण त्यांच्या दिशेने येत होते. यातील दुचाकी चालविणाऱ्याने हेल्मेट घातलेले होते तर मागे बसलेल्या रेनकोट घालून तोंडाला रुमाल बांधलेला होता. दरम्यान, या चोरट्यांनी लक्ष्मी सोनवणे यांच्या गळ्यातून दीड लाख रुपये किंमतीची पाच तोळे सोन्याची पोत आणि ७ हजार ५०० रुपयांची सोन्याचे आणि काळे मणी असलेली पोत जबरीने ओढून नेत ते हॉटेल जानव्हीच्या दिशेने पळून गेले.
दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातून जबरीने पोत लांबबताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरातील लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली. मात्र तो पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. याप्रकरणी लक्ष्मी सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे