जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५
शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना सोले यांनी ध्वजारोहण करून सोहळ्याची सुरुवात केली. १४ ऑगस्ट रोजी रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेच्या माननीय महोदया सौ.रोजमीन खीमानी प्रधान यांच्या सासुबाई सुषमा प्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
१५ ऑगस्ट रोजीच्या मुख्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे कॅप्टन मोहन कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कॅप्टन मोहन कुलकर्णी हे भारतीय सैन्यात एअर डिफेन्स आर्टिलरीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी जालंधर, लेह, सियाचिन हिमनदी व जोधपूर येथे उल्लेखनीय सेवा बजावली. लष्करी सेवेनंतर त्यांनी व्हीआयपी इंडस्ट्रीज लि. जळगाव येथे मॅनेजर (एच.आर., सुरक्षा व प्रशासन) म्हणून काम पाहिले तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील युवकांसाठी भरती रॅलींचे आयोजन केले. ‘फ्लॅग डे फंड’ उभारणीसाठी शासनाकडून त्यांना गौरव मिळाला आहे. सध्या ते रोटरी क्लब ऑफ जळगावचे सक्रिय सदस्य असून, संगीत व क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष गती आहे.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. हिमांशू शुक्ला (लाईफ टूल बॉक्स – Equip, Empower, Excel) आरती निलेश आधार (आयटी असिस्टंट, वूमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, जळगाव), राखी जैन (सीए गोल्ड मेडलिस्ट, मास्टर इन कॉमर्स), मिस महिमा सोनवणे (चाइल्ड फिजिओलॉजिस्ट) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले.
हिमांशु शुक्ला सरांनी पालकांना सामाजिक-भावनिक शिक्षणाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हा सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरले. देश पारतंत्र्यात असताना झालेला संघर्ष, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान आणि स्वातंत्र्यानंतरचा देशाचा विकास या सर्वांचा प्रभावी पट उलगडण्यात आला. परेड, कवायत, भाषणे व देशभक्तिपर गीतांनी शाळेच्या प्रांगणा देशभक्तीची लहर पसरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शनही विद्यार्थ्यांनीच सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांची कला, देशप्रेम आणि वक्तृत्व पाहून पालकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. कार्यक्रमानंतर पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व मान्यवर यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन सोहळा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा सर्वांचा अनुभव होता