जळगाव मिरर | २२ जुलै २०२३
अमळनेर शहरातील एका हॉटेल मालकाने वेटरच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून खून केला. ही घटना तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आली आहे. सुरत रुग्णालयातील पंचनामा आणि आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर हा गुन्ह्याची उकल झाली. पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५) रा. माळीवाडा याला ताब्यात घेतले. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयताचे नाव आहे.
नरेंद्र चौधरी याची अमळनेर परिसरातच साई व रूपाली हॉटेल आहे. दगडू पाटील हा तेथे वेटर होता. दगडू गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून येथे काम करीत होता. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने दि. २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलिस स्टेशनला माहिती दिली की, सकाळी सहा वाजता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे उपचारासाठी नेण्यात आले. दि. ६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. अमळनेर पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, सुरत येथील शवविच्छेदन अहवाल आणि नरेंद्र चौधरी याने दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर व पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळाजवळील फुटेज तपासले. त्यात दि. २२ रोजी पहाटे नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. पोलिस कर्मचारी घनश्याम पवार याच्या फिर्यादीवरून, नरेंद्र चौधरी (वय ३५ रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.