जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।
ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्रीपरशुराम यांचा जन्मोत्सव येत्या १६, २० व २१ एप्रिल या तीन दिवसांत समस्त ब्राह्मण समाज एकत्रित येत ब्राह्मण एकता दिवस म्हणून साजरा करणार आहे. विविध शाखा, पोटशाखा व भाषांमध्ये विखुरलेला समाज, हजारोंच्या संख्येने एकत्रित येत एकजुटीने भव्य शोभायात्रेद्वारे बहुमान वाढविणार आहे.
यंदा जन्मोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने रविवार, दि. १६ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळात स्व. बलदेव उपाध्याय फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन स्व. जनरल अरुण वैद्य चौक येथे (आकाशवाणी चौकात) केले आहे. तर सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजी चौक महाबळ येथून दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली आकाशवाणी चौक, रिंगरोड मार्गे टॉवर चौकातून पांजरापोळ गोशाळेत सांगता होणार आहे. गुरुवार, दि. २० रोजी सायंकाळी ६ वाजता उद्बोधन सत्रात ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे ‘आजचा ब्राह्मण समाज दशा व दिशा’ या विषयावर छत्रपती संभाजी राजे सभागृहात व्याख्यान होईल. शनिवार, दि. २२ रोजी सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते परशुराम रथ पूजन होऊन शोभायात्रा निघेल.
असे असेल नियोजन !
शोभायात्रेची सुरुवात सुभाष चौकातून वाजतगाजत होणार आहे. पारंपरिक वेशभूषा रंगीबेरंगी फेटे, भगवी टोप्या परिधान करून होणाया परशुरामांच्या जयघोषाने भव्य शोभायात्रेला दिव्य स्वरूप येणार आहे. शोभायात्रेत यंदा समाजातील युवांचा सहभाग असलेल्या प्रत्येकी ५० ढोलचे तीन भव्य पथके सहभागी होणार आहेत.
महिला व मुलामुलींचे भव्य लेझीम पथक व या लेझीम पथकातील महिलांची तलवारबाजी, दांडपट्याची प्रात्यक्षिके याचे विशेष आकर्षण राहणार आहे. तर राष्ट्रासाठी बलिदानाची परंपरा जोपासली जावी याकरिता शोभायात्रेत बाजीराव पेशवे व राणी लक्ष्मीबाई यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांची वेशभूषा साकारली जाणार आहे. शोभायात्रा दाणाबाजारात पोहोचल्यावर मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भगवान परशुराम यांचे पूजन होऊन शिवतीर्थावर शोभायात्रेचा समारोप होईल. समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सर्व कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर व महिला प्रकोष्ट प्रमुख मनीषा दायमा यांनी केले आहे.