जळगाव मिरर | ५ सप्टेबर २०२४
एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डवर ऑफर असल्याचे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समोरील व्यक्तीने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ७८ हजार रुपये परस्पर काढून घेत त्यांना गंडविले. ही घटना दि. १५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात ऑनलाईन ठगांविरुद्ध ३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वास्तव्यास आहे. त्यांच्या मोबाईलवर दि. १५ ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. त्या वेळी त्यांना ‘तुम्ही कोणते क्रेडीट कार्ड वापरता ?’ अशी विचारणा केली. त्यानंतर एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डची माहिती देत त्यावर चांगली ऑफर असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत दोन कार्ड वापरण्यापेक्षा एका नामांकीत कंपनीचे कार्ड मिळत असल्याने ते वापरू या विचाराने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानेही विश्वास ठेवला. संपर्क साधणाऱ्याने सेवानिवृत्तास लिंक पाठविण्यासह एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड केल्यानंतर ओटीपी व इतर कोणतीही माहिती दिली नाही तरी समोरील व्यक्तीला या निवृत्ताच्या मोबाईलमधील सर्व माहिती दिसू लागली. एकप्रकारे त्याने मोबाईलचा ताबा घेत निवृत्ताच्या खात्यातून दोन लाख ७८ हजार ८८५ रुपये काढून घेतले.
बँकेतून रक्कम काढल्याचे संदेश आल्याने आपली फसवणूक होत असल्याचे समजताच सेवानिवृत्ताने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी पोउनि दिगंबर थोरात यांना माहिती दिली व त्यांनी तातडीने कारवाई करीत बँकेच्या खात्यातून काढली जात असलेली रक्कम थांबविल्यामुळे इतर रक्कम सुरक्षित राहिली. सेवानिवृत्ताच्या मोबाईलवर संपर्क साधणाऱ्याच्या व्हॉटसअप डीपीवर संबंधित खासगी बँकेचा लोगो असल्याचे दिसत होते. त्यामुळे हा बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सेवानिवृत्तास वाटले व त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. या प्रकरणी सेवानिवृत्ताने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दि. ३ सप्टेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे