जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।
भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील सचिन रंगनाथ गवई (वय-४०) हे रिक्षाचालक असून १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रिक्षाने बोदवड फाट्याच्या पुढे जात होते. त्यावेळी समोरून येणारे विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येऊन रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीएफ ७७३) ला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक सचिन गवई यासह सिद्धांत सचिन गवई, राजू बळीराम इंगळे, योगेश कैलास हिरोडे आणि भीमराव भिकाजी हिरोळे सर्व रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर हे जखमी झाले. जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात गुरुवारी २० एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ट्रॅक्टर चालक प्रशांत सुरेश बडे रा. सालबर्डी तालुका मुक्ताईनगर याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रावण जवरे करीत आहे.