जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
एमआयडीसीतील डी ६६ येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री ११.१५ वाजता आग लागली. कंपनीत चटईचा तयार माल व कच्च्या मालाचा प्रचंड साठा होता. तीन तास लोटले तरी रात्री २ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. दरम्यान, कंपनीतील कुलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे कामगारांनी सांगितले. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी जळगावसह भुसावळ, वरणगाव, दीपनगर, चाळीगाव अशा विविध ठिकाणचे आठ ते दहा अग्निशमन बंद मागवण्यात आले आहे. रविवारी रात्रीच्या तिसऱ्या शिफ्टसाठी कामावर आलेले दहा ते पंधरा कामगार आग लागल्यानंतर बाहेर निघाले. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी तहसीलदार आयुष प्रसाद, शीतल राजपूत, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व कर्मचारी दाखल झाले. जेसीबी व क्रेनच्या मदतीने कंपनीची साइड वॉल तोडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, कंपनीतील पत्र्याच्या दुसऱ्या मजल्यावरील शेडमध्ये कामगारांसाठी जेवणाची खोली आहे. त्यातील कुलरच्या केबलला शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.