अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरात दि.१६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवर भांडारकर कंपाउंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून एक महिला व अल्पवयीन मुलाने २१ वर्षीय तरुणाला फायटर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात कृष्णा गिरीश वर्मा (२१, रा. अनमोल शॉपीजवळ) असे जखमींचे नाव असून, तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ रोजी सायंकाळी लहान मुलांचे भांडण झाले आणि एक अल्पवयीन मुलगा कृष्णा वर्मा यांच्या घरी येऊन शिवीगाळ करू लागला त्यावेळी कृष्णाचे आजोबा कांतीलाल वर्मा यांनी लहान मुलांचे भांडण होताच, तू शिवीगाळ का करतो, असे समजावत होते. त्यावेळी अल्पवयीन मलाने आजोबा कांतीलाल वर्मा यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. ही माहिती मिळताच, कृष्णा वर्मा हा त्या अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन जाब विचारू लागला. त्यावर अल्पवयीन मुलाने त्याला घरात ओढून घेतले आणि फायटरने डोके, कपाळावर मारहाण केली. त्याच्या आईने कृष्णाला खाली पाडून मारहाण केली. कृष्णाच्या काका-काकूंनी त्याची सुटका केली. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात नोंद केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.