जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२४
जळगाव तालुक्यातील एक २८ वर्षीय विवाहितेचा उपवास असल्याने पतीसोबत देवदर्शनासाठी गेलेले दाम्पत्य घरी येण्यासाठी निघाले. गतीरोधकावर दुचाकी उसळल्याने मागे बसलेल्या धनश्री गोपीचंद पाटील या खाली कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथे गोपीचंद पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नीचे उपवास असल्याने मंगळवारी सकाळी ते दुचाकीने धुळे येथे एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले. धरणगाव तालुक्यातील एकलग्नगावाजवळील मुसळी फाट्याजवळ असलेल्या गतीरोधकावर त्यांची दुचाकी उसळली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या धनश्री यांचा तोल जावून त्या कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते.