जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
शहरातील आकाशवाणी चौक येथे तपासणीसाठी येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला कट लागल्यामुळे ते खाली कोसळले. यामध्ये ट्रक हा रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, मूळ रा. निरुळ, ह. मु. भुसावळ) यांच्या अंगावरुन गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथील सैनिकांच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज मंगळवारी अखेर अपयशी ठरली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील साई शंकर नगरात चंपालाल पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य वास्तव्यास होते. दि. ६ रोजी ते भुसावळहून जळगाव शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. त्यात आकाशवाणी चौकात सिग्नल सुटल्यानंतर मजूर फेडरेशनच्या बाजूला चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. यामुळे दुचाकीवरील त्यांच्या पत्नी रागिणी पाटील या रस्त्यावर कोसळल्या, मात्र त्याचवेळी त्यांचा हात व पाय ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या हाताला व पायाचा अक्षरश चेंदामेंदा होवून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यव्यस्थ परस्थितीत उपचारासाठी दाखल केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या रागिणी पाटील यांना तात्काळ पुणे येथील सैनिकांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांची उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली.
चंपालाल पाटील व रागिणी पाटील यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पंधरा दिवसांपुर्वी त्यांच्या मुलीला मुलगी झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र दुर्देवी काळाने त्याच्यांवर झडप घातली आणि त्यामध्ये रागिणी पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.