जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२४
इमारतीला रंगकाम करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल खाली कोसळल्याने अजय राजकुमार यादव (वय २४, मूळ रा. प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु. रामेश्वर कॉलनी) या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी वाटिकाश्रम परिसर घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील प्रतापगड येथील अजय यादव हा तरुण कामानिमित्त जळगावात स्थायिक झाला असून तो सहा महिन्यांपुर्वीच आपल्या दोन मित्रांसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. तीनही मित्र इमारतीला रंगकाम करुन आपला उदनिर्वाह करीत होते. बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी वाटिकाश्रम परिसरात एका इमारतीचे रंगकाम करण्यासाठी अजय यादव हा भिंतीवर उभा होता. पहिल्या मजल्यावरुन त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.