जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनेतील जाचक अटी रद्द करा, जात निहाय योजना नको फक्त शेतकरी म्हणुन योजना मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व कृषीबांधवांना समान दर्जा दिला पाहिजे. शेतीशी निगडीत असलेल्या सर्व योजनांविषयी लाभ मिळणे हा शेतकयांचा अधिकार आहे व तो त्याला मिळायलाच हवा; परंतु शासनाकडून दिल्या जाणाऱ्या काही योजना विशिष्ट जातींना प्राधान्य न देता सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून प्रत्येक शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतो व त्यातुन त्याला चांगल्या प्रमाणात पैसा मिळु शकतो.
शेतीमध्ये नैसर्गिक उदभवणाऱ्या आपत्तीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता योजनामधील जाचक अटी रद्द केल्यास शेतकऱ्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. निवेदन देताना मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, हर्षल वाणी, संदीप मांडोळे व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते.