
जळगाव मिरर | २२ मार्च २०२५
जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाच घेण्याची पद्धत आज देखील सुरु असतांना नुकतेच कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजार रूपयांची लाच स्विकारतांना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कार्यालयात रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता केली आहे. प्रविण चौधरी असे अटक केलेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
तक्रारदार यांना वर्क ऑर्डर देण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण चौधरी यांनी दीड हजारांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात जळगाव लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने शुक्रवारी दुपारी धरणगाव पंचायत समिती कार्यालयातच सापळा रचला. यावेळी प्रविण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.