
जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२६
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या उताराजवळ असलेल्या सुरेश कलेक्शन परिसरातील चौक सध्या अपघातांचा अड्डा बनला असून, या ठिकाणी डी.पी. प्लॅननुसार असलेले सर्कल तातडीने विकसित करावे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सर्कलसाठी राखीव जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून सीमा भिंत उभारण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे.
उड्डाणपुलाखाली अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांच्या गाड्या आणि नागरिकांची मोठी वर्दळ यामुळे हा संपूर्ण परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे. येथून शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत आहे. या ठिकाणी सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असून, प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता पोकळे यांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी अॅड. पोकळे यांनी केवळ महापालिका आयुक्तांनाच नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्राची प्रत पाठवली आहे. सोबत ७/१२ उतारा आणि ले-आउटचा नकाशा जोडून त्यांनी सर्कलची अधिकृत जागा असल्याचे पुराव्यानिशी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अॅड. पोकळे यांनी सांगितले की, जळगाव सर्वे नंबर ३२९/२अ मधील संबंधित ले-आउट व डी.पी. प्लॅनमध्ये या ठिकाणी सर्कल स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे. मात्र संबंधित प्लॉटधारकांनी कोणतीही परवानगी न घेता सर्कलच्या जागेवर अतिक्रमण करत सीमा भिंत बांधली आहे. ही बेकायदेशीर भिंत त्वरित पाडून नियोजित सर्कल विकसित केल्यास वाहतूक कोंडी सुटेल आणि भविष्यातील अपघात टाळता येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.





















