अमळनेर : विक्की उत्तम जाधव
राज्यात शिंदे व फडणवीस सरकारने नुकतेच ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला देखील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे पण अमळनेर व पारोळा या तालुक्याला देखील दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, राज्यातील दुष्काळाचे शासनाने खरीप २०२३ मध्ये मुल्याकंन MAHA-MAHADAT या प्रणाली मार्फत केलेले आहे. त्यानुसार राज्यातील ४० तालुक्यांचा ट्रिगर -२ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय महसुल विभागाने दि. ३१ ऑक्टो. रोजी प्रकाशित केला असुन या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमधून अमळनेर व पारोळा हे तालुके वगळण्यात आले आहेत.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील सर्व महसुल मंडळात सलग ४१ दिवस पाऊसाचा खंड होता व त्यामुळे अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी होते. यामुळे या दोन्ही तालुक्यात भूजलाची पातळी कमी झाली आहे व रब्बी हंगामातील पेरणीखालील क्षेत्र सुद्धा घटले आहे. अमळनेर व पारोळा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये पिक पैसेवारी ५० पैश्यापेक्षा कमी आहे. या दोन्ही तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे व पुढील काळात तीव्र पाणीटंचाईची सुद्धा शक्यता आहे.
अमळनेर व पारोळा या तालुक्यात दुष्काळ जाहीर न झाल्याने अमळनेर व पारोळा तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. तरी माझी आपणांस विनंती आहे की दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा, पुन्हा वस्तुस्थितीचा आढावा घेऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत समावेश करण्यात यावा. असा या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.