
जळगाव मिरर | २२ मे २०२६
जळगाव शहरातील खुनाचा प्रयत्न आणि घर पेटवून देण्याच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अखेर अटक केली आहे. विशाल अजय सुरवाडे (वय ३०, रा. राजमलती नगर, दूध फेडरेशनजवळ, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये जळगावातील सरत रेल्वे गेट परिसरात दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला होता. या घटनेत रेहान उर्फ जानू संजू पटेल यास बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७३/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच प्रकरणातील आरोपी विशाल सुरवाडे याच्या नात्यातील सिद्धार्थ वानखेडे याचा झालेल्या भांडणात मृत्यू झाल्याचा राग मनात धरून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी राजू पटेल यांच्या राजमलती नगर येथील घरावर हल्ला चढवला होता. आरोपींनी घराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून साहित्याला आग लावत घर जाळण्याचाही प्रयत्न केला होता. याप्रकरणीही जळगाव शहर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमधील इतर आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र मुख्य संशयित विशाल सुरवाडे हा गुन्हा घडल्यानंतर सतत ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
दरम्यान, २० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की फरार आरोपी विशाल सुरवाडे हा जळगाव शहरात आला आहे. या माहितीच्या आधारे LCB पथकाने सापळा रचत राजमलती नगर, दूध फेडरेशन परिसरातून आरोपीला अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल बंजारी, पोलीस हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, सुरजीत धनगर, प्रविण भालेराव, रवींद्र कापडणे आणि सिद्धेश्वर डाफकर यांचा समावेश होता.





















